जळकोट : प्रतिनिधी
नांदेड ते बिदर या राष्ट्रीय महामार्गावर जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ तिरु नदीवर जुना पूल आहे. या पुलाची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यावर या ठिकाणी तलाव आहे का पूल असा प्रश्न प्रवाशांना पडतो आहे. यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलावर केव्हाही मोठा अपघात घडू शकतो, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
पुलाची ही अवस्था पाहता राष्ट्रीय महामार्ग विभाग मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का असा सवालही वाहनधारक तसेच प्रवासी व्यक्त करीत आहेत. तिरू नदीवरील तिरुका गावानजीक असलेल्या पुलावर पाणी साठत असून या ठिकाणच्या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील तिरुकेकर यांनी केली आहे. नांदेड ते बिदर व्हाया जळकोट मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे ९९ टक्के काम पूर्ण झाले परंतु जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ गत पाच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णच आहे. तिरूका गावाजवळ जवळपास एक किलोमीटर वरील काम अपूर्णच आहे. यासोबतच या गावाजवळ तिरू नदीवर मोठा नवीन पूल उभारण्यात आला आहे परंतु याचे कामही अर्धवट आहे.
यामुळे नागरिकांना जुन्या पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे. सन २०१६ मध्ये या पुलावरून पाणी गेले होते यामुळे पूल अगोदरच कमजोर झाला आहे आणि आता या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत आणि यामध्ये पाणी साचून राहत आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे अशा ठिकाणी पुल कमजोर बनू लागला आहे. ज्या ठिकाणी पाणी साचून राहत आहे त्या ठिकाणी केव्हाही पूल खाली ढासळू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे . हा राष्ट्रीय महामार्ग आहे का एखादा मळा वरचा रस्ता असा प्रश्न या ठिकाणाहून प्रवास करताना पडत आहे.
जळकोटकडील बाजू आणि उदगीरकडील बाजू दोन्हीकडील रस्ता अपूर्णच आहे , तिरका गावाजवळ उड्डाणपुलावर पावसामुळे मोठे दगड उघडे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. तिरुका गावात जाणा-या दादरामध्ये पाणी साचून राहत आहे यामुळे गावात जातानाही अडचण निर्माण होत आहे.