लातूर : प्रतिनिधी
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणारा तिसरा लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. १४ ते १७ मार्चदरम्यान होणार आहे. ‘पीव्हीआर’ थिएटरच्या दोन स्क्रीनवर चार दिवस चोखंदळ चित्रपट रसिकांना देश-विदेशातील २५ दर्जेदार सिनेमे पाहता येतील. हा फिल्म फेस्टिवल १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून नि:शुल्क आहे.
महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूरात होत असलेला हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पीव्हीआर थिएटरमध्ये होणार आहे. स्थानिक नियोजन विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्याकडे आहे. मराठवाड्यात अजिंठा-वेरुळ महोत्सवानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचा मान लातूरला मिळतो आहे. शुक्रवार, दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता फेस्टिवलचे उद्घाटन होईल. त्यानंतर उद्घाटनपर चित्रपट दाखवला जाईल.
उद्घाटनपर चित्रपट :
फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन ‘आर्मंड’ या नॉर्वेजियन चित्रपटाने होणार आहे. हाफडन उल्मन टोंडेल या तरुण दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असून यामध्ये पौगंडावस्थेतील मुलांच्या लैंगीक समस्या यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ही अतिशय उत्कृष्ट अशी प्रायोगिक कलाकृती आहे. महोत्सवाचा समारोप ‘टू ए लॅन्ड अन्नोन’ या चित्रपटाने होणार आहे. ही इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी कतार व पॅलेस्टाईन या देशांची संयुक्त निर्मिती आहे. पॅलेस्टाईन स्थलांतरीतांचा प्रश्न यामध्ये दाखविण्यात आला आहे.
तीन मराठी चित्रपट:
चित्रपट महोत्सवात ‘स्रो फ्लावर’(दिग्दर्शक- गजेंद्र अहिरे), ‘सांगळा’ (दि. रावबा गजमल) व ‘निर्जळी’ (दि. स्वाती कडू) हे तीन मराठी चित्रपटआहेत. याशिवाय चार चित्रपट इतर भारतीय भाषांमधील आहेत. यामध्ये ‘इन रिट्रिट’ (दि. मैसम अली), ‘तारीख’, (दि-हिमज्योती तालुकदार), ‘लेव्हल क्रॉस’ (दि-अरफाज आयुब) व ‘लच्ची’ (दि-कृष्णेगौडा) या चार चित्रपटांचा समावेश आहे.
जागतिक चित्रपट:
महोत्सवात १६ जागतिक चित्रपट आहेत. यामध्ये ‘प्लास्टीक गन’, ‘डेलीरियो’ ‘डार्क मॅटर’, ‘ब्लॅक टी’, ‘आउट ऑफ सिझन’, ‘मदर्स किंग्डम’, ‘शहिद’, ‘व्हीएत अॅड नाम’ आदी उल्लेखनीय आहेत. अशा रसिकप्रिय चित्रपटांची मेजवानी चार दिवस चालणा-या या महोत्सवात प्रेक्षकांना मिळणार आहे. सलग दोन वर्षे यापूर्वी झालेल्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. विशेषत: विद्यार्थी- विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. जागतिक सिनेमाची ओळख करून घेण्यासाठी सर्वस्तरातील प्रेक्षकांनी महोत्सवाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यंदाचे हे तिसरे वर्ष असून चित्रपटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. यावेळीही प्रेक्षक पहिल्योवर्षासारखाच चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. जगभरात गाजलेल्या अशा चित्रपटांचा लातूर परिसरातील रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. जिल्ह्यातील चित्रपट प्रेमींनी चार दिवसीय फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.