26.8 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeपरभणीतिसरी मुलगी झाल्याने पत्नीला पेटविले

तिसरी मुलगी झाल्याने पत्नीला पेटविले

जळत्या अंगाने पत्नी धावत सुटली

परभणी : प्रतिनिधी
तिसरीही मुलगीच झाल्याच्या रागातून संतापलेल्या पतीने माणुसकीला काळिमा फसणारे कृत्य केले आहे. यात पतीने चक्क पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार परभणीत घडला आहे. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाल्याची माहिती पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिसरीही मुलगीच झाल्यामुळे पती उठता-बसता पत्नीला शिवीगाळ, मारहाण करून तिच्याशी भांडायचा. गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान पतीने कहरच केला. यात चक्क टोकाचे पाऊल उचलत पत्नी मैना कुंडलिक काळे हिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. ही घटना परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात घडली आहे.

घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद
घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृत महिला मैना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडताना आणि दुकानात शिरतानाचे धक्कादायक असे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीचा जीव घेणा-या कुंडलिक काळेविषयी सध्या प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यातील क्रूर पती कुंडलिक काळे याच्या विरोधात कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या संतापजनक घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

सावित्रीबाईंनी जो लढा दिला तो अद्याप यशस्वी होताना दिसत नाही- चाकणकर
दरम्यान, या संतापजनक घटनेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. माणुसकीला काळिमा फासणा-या या घटनेने संताप निर्माण झाला आहे, गेली तीन वर्षे मी राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून काम करत आहे.

पण, महाराष्ट्रामध्ये फिरताना आजही अशा घटना घडताना दिसतात. चांद्रयान चंद्रावर गेले त्याचा अभिमान आहे. मात्र, अद्यापही महिलांचे प्रश्न तसेच आहेत. ते सोडवण्यासाठी मानसिकता बदलणे फार गरजेचे आहे. समाजामध्ये आजही सावित्रीबाईंनी जो लढा सुरू केला होता तो यशस्वी होताना दिसत नाही. अशा विकृत लोकांना कठोर शासन झाले पाहिजे, असे मत रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR