वलांडी : वार्ताहर
देवणी तालुक्यातील बोंबळी बु. येथे तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शीत पेयाचे आमिष दाखवून पुजारी असलेल्या नराधमाने हे दुष्कर्म केले आहे. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरारच आहे.
पिडित मुलींच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल वेंकट लांडगे महाराज (वय ५७ रा. बोंबळी बु, ता. देवणी) याने दि २२ मार्च रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या मुलीसह इतर दोन मुलींना आपल्या दुचाकीवर बसवून शेतात नेले. त्यांना थंड पेय पाजून मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. याबाबत घरच्यांना काही सांगितले तर जीवे मारण्याचीही धमकीही आरोपीने मुलींना दिली मात्र, मुलींनी झालेली घटना रात्री आपल्या नातेवाईकांना सांगितली. या बाबत देवणी पोलीस ठाण्यात गु.र. नं. १०२/२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ७४, ७५, ३५१(२) बीएसएनसह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या पोक्सो कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनंतर दि. २७ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड करीत असून प्रभारी अधिकारी म्हणून सपोनि डोके हे तपास करीत आहेत.