परभणी : परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरातील संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हिंसक वळण लागले. याला पोलिस यंत्रणाच जबाबदार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी तीन पोलिस अधिका-यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत.
राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. मेश्राम हे मंगळवारी परभणीत दाखल झाले. त्यांनी परभणी येथे घडलेल्या घटने प्रकरणी आढावा घेतला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. मेश्राम म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरातील संविधान प्रतिकृतीचा अवमान मनोरूग्णाने केला.
या पार्श्वभुमीवर रात्रीच मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला होता. यावेळी पोलिसांच्या गाडीवर उभे राहून आवाहन केले होते. पोलिसांच्या समोरच गाडीवर उभेवर राहून असे आवाहन करणे योग्य नव्हते. तसेच दुस-या दिवशी बंद दरम्यान दगडफेक व जाळपोळीची घटना घडत हिंसक वळण लागले. परंतू कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले. तर प्रशासनाने मात्र संवेदनशील व संयमीपणा दाखवल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, व्यापा-यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ते शासनाकडे व आयोगाडे सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
या घटनेत कोणत्या शक्ती सहभागी झाल्या त्यामुळे हे आंदोलन चिघळले याची चौकशी होणे गरजेचे असून सर्वांनी सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, परभणीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस अपयशी ठरले असून ३ पोलिस अधिका-यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे आदिंची उपस्थिती होती.