रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातून वाहणा-या रेणा नदीवरील रेणापूर, खरोळा व जवळगा या तीन बंधा-यांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने रेणा नदीला पुराचे स्वरुप आले आहे. वरचेवर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पात्रातील पाण्यात वाढ होत आहे. नदीकाठच्या शेतक-यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन रेणा मध्यम प्रकल्प शाखा अभियंता कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यात मागील चार- पाच दिवसांपासून जोरांचा पाऊस बरसत आहे. गुरुवारी (दि. २२) मुसळधार पाऊस झाल्याने रेणा नदीवरील रेणापूर, खरोळा व जवळगा हे तीन्ही बराज ओसडून वाहत आहेत. तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन रेणा नदी दुथडी भरुन वाहत आहे. रेणा नदीवरील तिन्ही बराजमधून विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी नदीकाठावर न थांबता आपल्या पशुधनासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे