लातूर : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी गेल्या तीन वर्षांपासूनचे मनपावरील प्रशासक राज संपणार आहे. जुनमध्ये लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लातूर शहर नगरपालिकेचे रुपांतर लातूर शहर महानगरपालिकेत दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले. लातूर शहर महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणुक २०१२ मध्ये झाली. काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती आणि लातूरच्या पहिल्या महापौरपदाचा मान प्रा. डॉ. स्मिता खानापुरे यांना मिळाला होता. २०१७ मध्ये लातूर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणुक झाली होती. या निवडणुकीत भाजपाला काठावर सत्ता मिळवता आली होती. परंतु, भाजपाला ही सत्ता पाच वर्षे टिकवला आली नाही. अडीच वर्षांनंतर भाजपाच्या दोन नगरसेवकांनी बंड केले आणि काँग्रेसचे पुन्हा सत्ता स्थापन केली. या पदाधिका-यांची मुदत २०२२ मध्ये संपली प्रशासक राज सुरु झाले. गेल्या तीन वर्षांपासून लातूर शहर महानगरपालिकेवर प्रशासक राज आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आता हे प्रशासक राज संपणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबीत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबत होत्या. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक येत्या जुनमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पावसाळ्याचा विचार करुन शहरी भागातील महानगरपालिकेच्या निवडणुका या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांआधी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवघ्या चार महिन्यांचा अवधी निवडणुक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने तत्काळ निवडणुक कार्यक्रम घोषीत होणे गरजेचे आहे. राज्य निवडणुक आयोग यासाठी कामाला लागले आहे.
राज्य निवडणुक आयोगाकडून अद्याप तरी कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाळ्यातील शेतीच्या कामांमुळे महानगरपालिकेची निवडणुक आधी होण्याची शक्यताअ.हे त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असा अंदाज लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव यांनी व्यक्त केला आहे.