पुणे : प्रतिनिधी
सोमवारी रात्री पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ज्या गाडीतून रक्कम सापडली ती गाडी अमोल नलावडे या व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता याप्रकरणी अमोल नलावडे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी माझी काहीही चूक नाही, असे अमोल नलावडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुण्यात खेड-शिवापूर परिसरात पाच कोटी रुपये सापडलेली ती गाडी उद्योगपती अमोल नलावडे यांच्या नावावर असल्याचे सांगितले जात होतं. मात्र आता याबद्दल अमोल नलावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘पाच कोटी रुपये सापडलेली ती गाडी मी काही महिन्यांपूर्वीच मी बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यामुळे या प्रकरणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मला पोलीस स्टेशन किंवा इतर कोणाचाही अजून तरी फोन आलेला नाही’ , असे अमोल नलावडे यांनी म्हटले.
माझी काही चूक नाही. मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. गाडी विकल्यानंतर मी त्या गाडीचे ऑनलाईन पैसे घेतले. त्यामुळे मला काही अडचण येईल असे वाटत नाही. आम्ही काही वर्षांपूर्वी शेकापचे काम करायचो. मात्र आता कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही, असेही गाडीचे अगोदरचे मालक अमोल नलावडे यांनी म्हटले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही आठवडे शिल्लक असताना पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. तर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
सध्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरु आहे. सध्या खेड-शिवापूर पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रक्कमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम कोणाची? कुठे नेण्यात येणार होती? इत्यादीची पडताळणी राजगड पोलिसांकडून सुरु आहे.