एखाद्याला ‘लोकप्रतिनिधी’ ही बिरुदावली प्राप्त होते ती जनतेने घातलेल्या मतांच्या भिकेमुळे! जनतेने पाठबळ दिल्यामुळेच तुम्ही लोकप्रतिनिधी सभागृहात बसू शकता. तेथे तुम्ही जनतेची गा-हाणी मांडायची असतात. लोकांची कामे मार्गी लावणे हे तुमचे कर्तव्य असते. तुम्ही पाच वर्षे चांगल्या प्रकारे काम केले तर जनता तुम्हालाच पसंती देते. याचाच अर्थ असा की जनता तुमची मालक आणि तुम्ही जनतेचे सेवक, नोकर. तेव्हा यात कमीपणा मानण्याचे काही कारण नाही. जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला सोयी-सुविधा मिळतात. काही लोक मिळालेल्या संधीचे सोने करतात तर काही जण वेगळ्या अर्थाने स्वत:चे ‘सोने’ करतात. काही जण घोटाळे करून स्वत:चे घर भरतात आणि उजळ माथ्याने फिरतात. ‘उडदामाजी काळे-गोरे’ असणारच! निवडणुका लागल्या की जनतेची सेवा करण्यासाठी इच्छुक मंडळी जनतेच्या दारी मतांची भीक मागतात,
त्यासाठी लोटांगणही घालतात, आश्वासने देतात, मोठमोठ्या सभा घेतात, कॉर्नर बैठका घेतात, जनतेला मतदार राजा असे संबोधतात. मतदार राजाने एकदा का भीक घातली की निवडून आलेली प्रजा सरड्यासारखे रंग बदलते! निवडून येण्यापुरते जनतेला मालक संबोधणारी मंडळी, निवडून आल्यानंतर स्वत:ला मालक आणि जनतेला नोकर समजू लागते. पाच वर्षांसाठी सत्ता मिळाल्याने, खुर्ची पक्की झाल्याने काहीही बोलण्याची, बरळण्याची आपल्याला मुभा आहे असे त्यांना वाटू लागते. यासंबंधीची असंख्य उदाहरणे देता येतील. सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
कालकाजीमधील रस्ते प्रियंका गांधी यांच्या गालासारखे गुळगुळीत बनवू असे वक्तव्य बिधुरी यांनी केले. ते पुढे म्हणाले, लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे रस्ते हेमामालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिले होते परंतु लालू आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन दिले आहे ते पूर्ण करीन असे बिधुरी म्हणाले. रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या आडनावावरून टीका केली होती. त्यावरून आतिशी यांना पत्रकार परिषदेत रडू कोसळले होते. बिधुरी यांच्या टीकेला उत्तर देताना आतिशी म्हणाल्या, आपले राजकारण एवढे खालच्या स्तरावर कसे जाऊ शकते? १० वर्षे खासदार असताना बिधुरी यांनी कालकाजीसाठी काय काम केले ते सांगावे. त्यांनी माझ्या वडिलांना शिवीगाळ करून नव्हे तर त्यांच्या कामाच्या आधारे मते मागावीत. आतिशी यांचे म्हणणे योग्य असले तरी रमेश बिधुरी नक्कीच तसे काही करणार नाहीत, कारण त्यांच्यासमोर त्यांचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांचा आदर्श आहे.
पंतप्रधान मोदी दहा वर्षांत आपण काय केले ते सांगत नाहीत, उलट साठ वर्षांत काँग्रेसने काय केले? असा सवाल करतात. आता काहीही बरळण्याचे दुसरे उदाहरण. शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावेत. साईबाबा मंदिरात मोफत जेवण मिळत असल्याने महाराष्ट्रातील भिकारी शिर्डीत गोळा झाले आहेत, असे अपमानजनक वादग्रस्त वक्तव्य भाजपनेते, माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी रोज देशभरातून हजारो भाविक येत असतात. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे भाविक श्रद्धेपोटी येतात, मोफत भोजन मिळते म्हणून येत नाहीत. देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असे म्हणणे हा साईभक्तांचा अपमान आहे. अन्नदान हे चांगले काम, पुण्यकाम मानले जाते. त्याचा अपमान करणे योग्य नाही.
उलट अशा उपक्रमाचे कौतुक झाले पाहिजे. तिरुपती बालाजी मंदिरात कित्येक वर्षांपासून असा उपक्रम सुरू आहे. लोकांनी निवडून दिले म्हणजे ‘उचलली जीभ की लावली टाळूला’ असे करायचे नसते हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार? आता तिसरे उदाहरण. बारामतीतील मेदड येथे एका नवीन पेट्रोल पंपाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचे दिसले. अजित पवारांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदने दिली जात होती. निवेदने स्वीकारून अजित पवार कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिका-यांना देत होते. त्याच वेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाली नसल्याचे म्हटले. त्यानंतर काही नागरिकांनीही त्याचीच री ओढली अन् रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार संतापले आणि म्हणाले, अरे तुम्ही मला मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात.
मला सालगडी केलंय का? अनेक वेळा थेट व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना खडसवणारे अजित दादा संतापले असले तरी त्यांनी शांत डोक्याने विचार केला तर त्यांच्या लक्षात येईल की, जनता तुमची मालकच आहे आणि तुम्ही त्यांचे सालगडीच आहात. पाच वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा त्याच पदावर (सालगडी) ठेवायचे की नाही हे जनताच ठरवते. तेव्हा उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. जनतेने तुमच्याकडे पाणी देण्याची मागणी केली तेव्हा तुम्ही काय म्हणालात? हजारो कोटींचा सिंचन घोटाळा झाला तरी जनता शांतच राहिली. तुमचे अपराध तिने पोटात घातले. मालकच नोकराला माफ करत असतो. त्याच्यासमोर आपला रुबाब दाखवायचा नसतो. मालकानेच तुमच्या उदरभरणाची सोय केली आहे हे विसरू नका.