कोल्हापूर : प्रतिनिधी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श दररोज ऐकवणारे प्रत्यक्षात मात्र शेतकरीविरोधी धोरणे राबवून औरंगजेबापेक्षा क्रूर वागत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतक-यांची स्मशानभूमी बनत आहे, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका पत्रकाद्वारे राज्यकर्त्यांवर केला.
महाराष्ट्रातील पहिला शेतकरी साहेबराव करपे यांनी आत्महत्या केली. त्यांचा १९ मार्च हा स्मृतिदिन आहे. प्रगतिशील शेतकरी असलेले साहेबराव करपे हे अथक प्रयत्न करूनही कर्जातून बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे वर्धा येथील गांधी आश्रमात जाऊन महात्मा गांधींचे दर्शन घेऊन कुटुंबियासहित आत्महत्या केली. ही महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या. त्यानंतर महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या सगळ्या प्रमुख पक्षाची सरकारे येऊन गेली. पण परिस्थिती काही सुधारली नाही.
कोरोना काळात जगाची चाके थांबली होती. पण शेतीने जगाला आणि देशाला तारले. तरीही राज्यकर्त्यांना याची जाण नाही. गेल्या पाच वर्षांत कृषिप्रधान देशातील ६ लाख ४२ हजार हेक्टर तर राज्यातील पिकाखालील ३ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र कमी झाले. गेल्या पाच वर्षांत १५ हजार ८२४ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. पण महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना या दाहक वास्तवापेक्षा औरंगजेबाची कबर, खोक्या, बोक्या, आका यातच रस आहे, असे जळजळीत वास्तवही पत्रकात नमूद केले आहे.
ज्यावेळेस शाहिस्तेखान पुण्याकडे चालून येतो आहे, असे शिवरायांना गुप्तहेरांनी सांगितले, त्यावेळेस त्यांनी सर्जेराव जेधे यांना कळविले की, शेतक-यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवा, या कामात हयगय केली तर पातक लागेल. म्हणजे शेतक-यांचे हित जोपासणे हे पुण्य आहे, तर शेतक-यांना वा-यावर सोडणे पाप आहे, अशी शिवरायांची शेतक-यांप्रती भूमिका होती. शेतक-यांचे हित हेच राज्याचे हित, हे शिवरायांचे धोरण होते, याची आठवण ठेवा असाही इशारा शेट्टी यांनी दिला.
शेतक-यांच्या कवट्यांचा हार
कुठे फेडाल हे पाप. तुमच्या या दळभद्री धोरणामुळेच महाराष्ट्र ही शेतक-यांची स्मशानभूमी झाली आहे. राज्यकर्त्यांनो तुम्ही तर औरंगजेबापेक्षाही क्रूर वागत आहात, अशी खंत व्यक्त करून, जरा तरी लाज बाळगा नाहीतर पुढची पिढी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कवट्यांचा हार घालून तुम्हाला जोड्याने हाणल्याशिवाय राहणार नाही.