परभणी / प्रतिनिधी
शहरातील विकास कामे सरकारकडून होत नसतील तर राजीनामा देतो असे विधानसभेत बोलतांना आ.डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले. त्यावर शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी आक्रमक पवित्रा घेत दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मात्र त्यावेळी तुम्हाला विकास कामे करता आलेली नाहीत. विकास कामांसाठी निधीही आलेला नाही. केवळ ज्या योजना सरकारकडून होणार असतील त्यावरच आपण प्रश्न विचारून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असुन आपण राजीनामा दिल्यास परभणीकरांचेच भले होईल. त्यामुळे आपण राजीनामा द्याच असा घणाघात शिवसेना नेते आनंद भरोसे यांनी केला.
शिवसेना पक्ष कार्यालयात शनिवार, दि.२२ रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, २०१४ ते २०२४ या कार्यकाळात परभणीचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण वावरत होतात. त्यात साडे सात वर्ष आपण सत्तेत होतात. मात्र कुठल्याही विकास कामांसाठी आपण कधीही पाठपुरावा केलेला नाही. तसेच कोणतेही मुलभूत प्रश्न सोडविण्यात आलेले नाहीत. तसेच भरीव असा निधीही आणता आलेला नाही. केवळ परभणी शहराच्या विकासासाठी मंजुर झालेल्या योजना पुर्णत्वास येत असल्याचे लक्षात येताच त्यावरच आपण सभागृहात प्रश्न मांडले असुन केवळ श्रेय घेण्याचेच काम केल्याचा आरोप भरोसे यांनी केला.
परभणी शहराची १९९४ पासुन रखडलेली नवीन पाणीपुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुर केली. त्यावेळी त्यांनी ही महापालिका कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे हे न पाहता ११० कोटी रूपये निधी दिल्याचे ते म्हणाले. परभणी शहरातील झालेल्या दगडफेक व जाळपोळीच्या घटनेत व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या व्यापा-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण सभागृहात गप्प का बसलात असा आरोप भरोसे यांनी केला. शहरातील नटराज रंग मंदिराच्या पुर्नजिवनासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची मागणी न करता नवीन नाट्यगृह बांधकाम सुरू केले. मात्र त्याचेही काम अर्धवट अवस्थेत असुन केवळ सत्कार स्विकारण्यातच आपण मश्गुल राहिल्याचा आरोप केला. बाजार समितीतील महायुतीच्या संचालकांनी सीसीआयचे केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला याचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच लोअर दुधना प्रकल्पातून सुरूवातीपासून उन्हाळ्यात एक पाणी पाळी सोडण्याची अट घालण्यात आलेली आहे.
त्यामुळे दरवर्षीच हे पाणी सोडण्यात येते मात्र श्रेय लाटण्यासाठी आ.डॉ. राहुल पाटील सध्या जलपुजन करीत असल्याचे ते म्हणाले. एमआयडीतील उद्योजकांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत त्यावर कधीही आवाज उठविला नसुन उद्योगमंत्र्यांनी उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन वेळा बैठका घेतल्या मात्र या संदर्भात कुठलीही माहिती लोकप्रतिनिधींना नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ खोट नाटे बोलून श्रेय घेण्याचाच प्रयत्न मागील दहा वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे आपण राजीनामा दिल्यास परभणीकरांचेच भले होईल असा टोल भरोसे यांनी मारला.
या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे भास्करराव लंगोटे, शेख शब्बीर, माणिक पौंढे, बाळासाहेब पानपट्टे, गीता सुर्यवंशी, कल्पना दळवी, इंजि. प्रल्हाद होगे पाटील आदी उपस्थित होते.