पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात भगवा फडकवायचा आहे, असे विधान केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ते भडकले. माहिती पोहोचवणे हे माध्यमांचे काम आहे, असे सांगतानाच तारतम्याने बातम्या द्या, जरा सबुरी ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण राज्यातील शासकीय, निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणीकरिता ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी उपस्थित उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रसार माध्यमांना सबुरीचा सल्ला देतानाच हे असले धंदे बंद करून ख-या बातम्या द्या, असेही अजित पवारांनी सांगितले. स्वारगेट प्रकरणावरूनही ते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात अनेक घटना घडल्या. मात्र, कोणतीही घटना घडली की त्यावर पोलिसांचा रिपोर्ट येऊ द्या, त्यासाठी थोडे थांबा. कोणत्याही गोष्टीत उतावीळपणा, आततायीपणा करू नका, सबुरीने घेतले तर बरे होईल, असेही त्यांनी सांगितले.