पुणे : प्रतिनिधी
पाकिस्तानला पाठिंबा देणा-या तुर्कीला भारतीय व्यापा-यांनी धक्का दिला आहे. ‘बॅन तुर्की’ म्हणत व्यापा-यांनी तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. परिणामी इराणमधून येणा-या सफरचंदाचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात १० किलो सफरचंदामागे २०० ते ३०० रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो २० ते ३० रुपये दराने वाढ झाली आहे.
तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यामुळे भारतातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता व्यापा-यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलँड सफरचंदाच्या भावात पेटीमागे २०० ते ३०० रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील सफरचंदाचे आडतदार, श्री गुरुदेव दत्त फ्रूट एजन्सीचे सत्यजित झेंडे यांनी दिली. मार्केट यार्डात देशासह परदेशातून सफरचंदाची आवक होत असते. भारत-पाकिस्तान तणावामुळे परदेशातील सफरचंदाच्या व्यवहारावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
जगभरातून विविध देशांकडून भारताला पाठींबा मिळत असताना तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. मात्र यामुळे भारतातील व्यापारी चांगलेच भडकले असून दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकला पाठिंबा देणा-या तुर्कीबद्दल व्यापा-यांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवला आहे. त्याअंतर्गतच तुर्की सफरचंदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा उत्पादन कमी असले तरी यंदा भारत-पाकीस्तान युध्दजन्य परिस्थितीत तुर्कीने पाकिस्तानला पाठींबा दिला. त्यामुळे अनेक व्यापा-यांनी आक्रमक भूमिका घेत तुर्कीकडून खरेदी बॅन केली असून व्यापा-यांनी ‘आपला देश, आपलं राष्ट्र प्रथम’ ही भूमिका घेत, देशासाठी तुर्कीकडून खरेदी करणे टाळले आहे.