पुण्यासह अनेक शहरांत मेट्रोचे काम सुरू
पुणे : प्रतिनिधी
भारताविरोधात पाकिस्तानचे समर्थन करत त्यांना लष्करी ड्रोन्स पुरवणा-या तुर्कीला भारताने धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आधी भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द करुन तुर्कीवर बहिष्कार टाकला. तसेच भारतीय व्यापा-यांनीही तुर्कीच्या अनेक वस्तूंवर बहिष्कार टाकला. त्यानंतर सेलेबी कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा भारताने निर्णय घेतला. आता तुर्कीच्या गुलेरमक कंपनीचा नंबर लागू शकतो. पुण्यासह अनेक शहरांच्या मेट्रोचे कंत्राट मिळालेल्या गुलेरमक कंपनीचे कंत्राट रद्द होऊ शकते.
पुणे मेट्रोसह सुरत, कानपूर आणि भोपाळ या शहरातील मेट्रो बनवण्याचे कंत्राट गुलेरमक या तुर्कस्तानमधील कंपनीला देण्यात आले आहे. भारतातील भागीदार कंपन्यांसोबत गुलेरमक कंपनी या शहरांमध्ये मेट्रो मार्गातील बोगदे तयार करण्याचे काम करत आहे. पाकिस्तानचे खुले समर्थन केल्याबद्दल तुर्कस्तानच्या सेलेबी कंपनीचे भारतातील एअरपोर्टवर ग्राउंड हँडलिंगची सेवा देण्यासाठीचे कंत्राट रद्द केले. आता भारतात हजारो कोटी रुपयांची कंत्राटे दिलेल्या गुलेरमक कंपनीला तोच न्याय लावला जाणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
गुलेरमक कंपनीला कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या भारतातील भागीदार कंपनीसोबत भोपाळ मेट्रोचे बोगदे तयार करण्यासाठी ७६९ कोटींचे कंत्राट मिळाले आहे. हे लवकरच काम सुरू होणार आहे. तसेच कुमार बिटवेल या भागीदार कंपनीसोबत सुरत मेट्रोचे १०७३ कोटींचे कंत्राट मिळाले. गुलेरमक कंपनीला केपीआयएल या भारतातील भागीदार कंपनीसोबत कानपूर मेट्रोचे ७६२ कोटींचे कंत्राट मिळाले असून काम सुरु आहे.
पुण्यात २२८३ कोटींचे
मिळाले होते कंत्राट
गुलेरमक कंपनीने टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भागीदार कंपनीसोबत पुणे मेट्रोचे २२८३ कोटींचे काम नुकतेच पूर्ण केले. कंपनी पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्यांसाठीची कंत्राटे मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे नवे कंत्राट मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.