तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख शिवारात दिडशे किलो वजनाची आठ फूट लांबीची मगर आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या टिमला शनिवारी दि. २८ सप्टेंबर रोजी मगर पकडण्यात यश आले आहे. त्यामुळे वडगाव येथील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख शिवारात मंदिर ट्रस्टची जमीन आहे. या शेत जमिनीतील विहिरीत गुरुवारी दि. २६ सप्टेंबर रोजी एक मोठ्या आकाराची आठ फूट लांबीची मगर नागरिकांना दिसून आली होती. त्यामुळे वडगाव लाख येथील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली होती.
वन विभागाच्या टिमने अथक परिश्रम करून दीडशे किलो वजनाची सात ते आठ फूट लांबीची मगर शनिवारी पहाटे पकडली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकास मगर पकडण्यात यश आल्यानंतर वडगाव लाख येथील ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.