मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यभरातील मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन या बँकेतील व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही, याची तपासणी करण्यास सांगितले होते. तसेच बँकांना निवेदन देण्याच्याही सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मनसैनिकांनी राज्यभरातील बँकेत जाऊन मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी केली.
यासंदर्भात काही वेळापूर्वीच मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ या निवास्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरील आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्र काढून हे आंदोलन थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने बँकांना मराठीचा सन्मान करायला लावायला हवा. कायदा हातात घेण्याची आमचीही इच्छा नाही. तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रातून म्हटले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्यावरचे लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरले जात नसेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील!’
उदय सामंत आणि राज ठाकरेंची भेट
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज भेट घेतली आहे. बँकांमध्ये मराठी बोलत नसल्याच्या मुद्यावरून राज ठाकरेंची मंत्री उदय सामंत यांच्यासोबत भेट झाली होती. राज्यातील ज्या बँकांचे व्यवहार मराठीत होत नाहीत, यासाठी सर्व समित्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.