मदनसुरी : वार्ताहर
निलंगा तालुक्यातील कोकळगाव, सांगवी, नदी हत्तरगा कामले वाडी, रामतीर्थ, मदनसुरी आदीं शिवारात पावसाने मंगळवारी दुपारनंतर तालुक्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील तेरणा परिसरात प्रचंड मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. मदनसुरी महसूल मंडळात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसामुळे हिरावला आहे. यामुळें शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महसूल मंडळात मंगळवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. उभे सोयाबीनचे व इतर पीक पाण्यात गेले असून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने व विमा कंपन्यांनी तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. जवळपास अडीच तास मुसळधार पाऊस झाला. विमा कंपन्यांकडे विमा भरूनही विमा मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त आहे.