मुंबई : प्रतिनिधी
कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या बंडा संदर्भात कविता केल्यामुळे शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी रविवारी (२३ मार्च) रात्री कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली आहे. याचपार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांचा अवमान करणा-यांना शिक्षा कधी देणार असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि वाद हे जुनं समीकरण आहे. मात्र आता त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एका कवितेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्वीट करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तेव्हा कुणी आपटेचे कार्यालय फोडल नाही. राहुल सोलापूरकरने शिवाजी महाराजांनी लाच दिली म्हटले तर कुणी त्याच घर फोडले नाही. प्रशांत कोरटकरने शिवाजी महाराजांचा बायोलोजिकल बाप कोण विचारला, तर त्यालाही कुणी फोडले नाही. पण आपल्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली म्हणून लगेच कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला ढोंगी म्हटले आहे.