-फडणवीसच मुख्यमंत्री, गुरुवारी सायंकाळी होणार शपथविधी
-शिंदेंचा सस्पेन्स कायम, मी तर शपथ घेणार, अजित पवारांची गुगली
मुंबई : प्रतिनिधी
५ वर्षांपूर्वी निवडणुकीला सामोरे जाताना मी पुन्हा येईन अशी घोषणा करून गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या उशिराने व अनेक अडथळ््यांना तोंड देत अखेर आपला निर्धार प्रत्यक्षात आणला. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत फडणवीस उद्या राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार असले तरी मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये येण्यास राजी नाहीत. त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असून, स्वत: फडणवीस यांनी पुन्हा वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि सरकारमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. त्यावर गृह खाते मिळणार असेल तरच आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ, अशी अट शिंदे यांनी घातली. त्यावर यासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठीच निर्णय घेऊ शकेल, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे उद्यापर्यंत काय निर्णय होणार, हे पाहावे लागेल.
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व बहुमत मिळूनही आधी मुख्यमंत्री पद व नंतर खातेवाटपासाठी झालेल्या रस्सीखेचीमुळे नवे सरकार सत्तेवर येऊ शकले नव्हते. पंधराव्या विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाले. या निवडणुकीत १३२ जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तावाटपाची चर्चा लांबल्याने महायुतीच्या सत्तास्थापनेला विलंब होत होता. अखेर ही कोंडी परवा फुटली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या निरीक्षकांच्या उपस्थितीत आज पक्षनेता निवडीसाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात झाली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाली. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उईके, मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संभाजी पाटील निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप बोरसे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी अनुमोदन दिले. बैठकीत फडणवीस यांच्या नावाचा एकच प्रस्ताव आल्याने रुपाणी यांनी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे घोषित केले.
त्याग करण्याची तयारी
ठेवा : फडणवीस
महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमचे सरकार २४ तास काम करेल आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी आमदारांचे आभार मानताना महायुतीच्या सरकारमध्ये आपल्या मनातील सर्वच गोष्टी पूर्ण होणार नाहीत, याची जाणीव देऊन त्याग करण्याची तयारी ठेवा असे सूचकपणे सांगितले. २०१९ साली आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता. पण दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला. त्या काळात जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी झाली. आता आपण नवीन सुरुवात करीत आहोत, असे फडणवीस म्हणाले.
सत्तास्थापनेचा दावा
नेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवारही तेथे आले. त्यांची चर्चा झाल्यानंतर या तिघांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यांनी फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी पाचारण केले व उद्याच्या शपथविधीची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली.
मी शपथ घेणार, शिंदेंचा दादांना टोला
शिंदे यांनी आपला निर्णय नंतर सांगतो, असे स्पष्ट केले तेव्हा अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मी तर उद्या शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही, असे मिश्कीलपणे जाहीर करून टाकले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे, असा टोला लगावला.
एकनाथ शिंदे अजूनही
गृहमंत्रालयावर अडून
राजभवनातील पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेच्या आमदारांशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. सर्वांनी त्यांना मंत्रिमंडळात येण्याची गळ घातली. परंतु शिंदे यांनी बघुया असे सांगून आपली भूमिका संदिग्ध ठेवली. त्यामुळे सायंकाळी देवेंद्र फडणवीस पुन्हा वर्षा निवासस्थानी गेले व त्यांनी शिंदे यांना सरकारमध्ये येण्याची विनंती केली. परंतु त्यांनी ही विनंती मान्य केली की नाही, याबाबत रात्रीपर्यंत संभ्रम कायम होता. शिंदे यांनी गृह खात्यासाठी आग्रह धरला आहे. परंतु फडणवीस हे खाते सोडण्यास तयार नाहीत. यामुळे आपला पक्ष सत्तेत असेल पण मी स्वत: येणार नाही, अशी ठाम भूमिका शिंदे यांनी घेतली. त्यावर आता भाजप गृह खाते देणार का, हा प्रश्न आहे.