नागपूर : वृत्तसंस्था
हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्याचा थेट परिणाम थर्टी फर्स्टच्या पार्टीवर दिसणार आहे. ३१ डिसेंबर रोजी होणा-या पार्टीचे नियोजन करत असाल तर त्यात आणखी वाढ करावी लागण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेत नवीन सुधारणा विधेयकावर शिक्कामोर्तब झाले.
या नवीन अपडेटमुळे दारू आणि खाद्यपदार्थ महागणार आहेत. ग्राहकांना जादा पैसे मोजून आनंद साजरा करावा लागणार आहे. राज्यातील तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीचा अजून हा एक पर्याय शोधण्यात आला आहे. राज्यातील क्लबमध्ये दारू आणि खाद्यपदार्थासाठी मोठा खर्च येणार आहे. क्लबमध्ये खरेदी केलेल्या वस्तूंवर जीएसटी आणि मूल्यवर्धित कर अशा दोन्ही प्रकारचे कर भरावे लागणार आहेत. या दोन्ही करांमुळे राज्याच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होईल. गेल्यावर्षी जीएसटीच्या रुपाने राज्याच्या तिजोरीत अडीच लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
क्लबमध्ये आतापर्यंत मद्याच्या पेगवर व्हॅट आकारला जात नव्हता. बाहेरच्या हॉटेलमधील दारू महाग तर क्लबमधील दारू स्वस्त असा प्रकार होता. आता कोणत्याही बारप्रमाणेच क्लबच्या पेगवरही १० टक्के व्हॅट द्यावा लागेल. क्लबमधील खाद्यपदार्थांसाठी सुद्धा पैसे मोजावे लागतील. आता इतर हॉटेलप्रमाणेच क्लबमधील खाद्यपदार्थावर देखील ५, १२ आणि १८ टक्के या दराने जीएसटी मोजावा लागेल. राज्यपालांची मोहोर उमटताच या विधेयकाची अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबर रोजी क्लबमध्ये नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.