मुंबई : प्रतिनिधी
एका कुटुंबासाठी येणारा स्वयंपाकाचा खर्च डिसेंबर २०२४मध्ये वाढला. टोमॅटो, बटाटे यांसारख्या सतत लागणा-या भाज्यांचे भाव भडकल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे निरीक्षण क्रिसिल रेटिंग एजन्सीने ताज्या अहवालात नोंदवले आहे. ‘रोटी, राईस, रेट रिपोर्ट’ असे या अहवालाचे नाव आहे. त्याचवेळी, सामान्य माणसाच्या अन्नावरील खर्चाचा अंदाज लावणारी संस्था, क्रिसिलने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, डिसेंबरमध्ये मांसाहारी थाळीची किंमत वार्षिक आधारावर १२ टक्के आणि मासिक आधारावर तीन टक्क्यांनी वाढून ६३.३ रुपये झाली आहे.
डिसेंबरमध्ये शाकाहारी जेवण सरासरी ६ टक्क्यांनी महागले. यामुळे एका शाकाहारी थाळीची किंमत सरासरी ३१.६० रुपये झाली, जी डिसेंबर २०२३मध्ये २९.७० रुपये होती. मात्र नोव्हेंबर २०२४ मधील ३२.७० रुपये किमतीच्या मानाने डिसेंबरमधील थाळी किंचित स्वस्त झाल्याचे स्पष्ट झाले. शाकाहारी थाळीप्रमाणे डिसेंबर २०२४मध्ये मांसाहारी थाळी वार्षिक आधारावर १२ टक्क्यांनी महागली आणि सरासरी ६३.३० रुपयांवर गेली. मांसाहारी थाळीमध्ये सरासरी ५० टक्के वाटा असलेल्या ब्रॉयलरचा प्रतिकिलोचा भाव सरासरी २० टक्के वाढला आहे. मांसाहारी थाळी महाग होण्यामध्ये ब्रॉयलर महाग झाल्याचा मोठा वाटा दिसून येतो आहे.
मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत नोव्हेंबर २०२४च्या तुलनेत डिसेंबर २०२४मध्ये टोमॅटोच्या नव्या पिकामुळे किमती १२ टक्के कमी झालेल्या आढळल्या. यामुळे शाकाहारी थाळी ३ टक्क्यांनी स्वस्त होण्यास मदत मिळाली. वर्षभराचा आढावा घेतल्यास कांद्याचा भाव कमी झाला असून बटाट्याचा भावही २ टक्के घसरला आहे.
मांसाहारी थाळीही महागली
नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान कांद्याच्या किमतीत १२ टक्के घट तर बटाट्याच्या किमती दोन टक्के कमी झाल्याने दर कपात झाल्याचे त्यात म्हटले आहे. थंडीच्या लाटेमुळे उत्पादनात घट, सण आणि लग्नामुळे मागणीत वाढ आणि खाद्य खर्चात वाढ यामुळे ब्रॉयलरच्या किमती ११ टक्के वाढल्याचे अहवालात पुढे म्हटले आहे, ज्यामुळे डिसेंबरमध्ये मांसाहारी थाळीच्या किमतीत देखील तीन टक्क्यांनी वाढ झाली.