पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील लोणी काळभोर परिसरामध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणा-या पतीचा पत्नीने प्रियकराच्या साथीने खून केला. रवींद्र काशीनाथ काळभोर (वय ४५, रा. लोणी काळभोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रवींद्र झोपेत असतानाच मध्यरात्री डोक्यात फावड्याच्या दांडक्याने जोरात वार करून त्यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत गुन्ह्याचा छडा लावत शोभा रवींद्र काळभोर (वय ४२), गोरख काळभोर या दोघांना अटक केली. ही घटना सोमवारी (दि. १) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोरख आणि शोभा या दोघांचे अनैतिक संबंध होते. रवींद्र यांना याबाबत माहिती होती. त्यातूनच पती रवींद्र आणि पत्नी शोभा या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दारू पिऊन रवींद्र सतत शोभाला मारहाण करत होता. त्यामुळे गोरखचा देखील रवींद्रवरती राग होता. शनिवारी (दि. २९) शोभा आणि रवींद्र या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्या वेळी शोभा आपल्या मुलांना घेऊन माहेरी थेऊरला गावी निघून गेली. रवींद्रकडून सतत होणा-या त्रासाला शोभा देखील कंटाळली होती. त्यामुळे प्रियकर गोरख आणि शोभा या दोघांनी रवींद्रला संपवायचे ठरवले.
रवींद्र आणि गोरख एकाच गावचे राहणारे. दोघांच्या घरामध्ये फक्त शंभर मीटरचे अंतर होते, तर शेतीचा बांधाला बांध होता. गोरखचे रवींद्र यांच्या घरी कायमचे येणे-जाणे असायचे. दोघांनी एकत्र चारचाकी गाडी देखील खरेदी केली आहे. तर गोरख याने साडेतीन लाख रुपये रवींद्र यांना दिले होते. रवींद्र यांना दारूचे व्यसन होते. अनेकदा गोरख त्यांना दारू पाजत असे. त्या रात्री देखील शोभा थेऊरला गेल्यामुळे रवींद्र सोमवारी (दि. ३१) एकटेच घरी होते. त्या दिवशी त्यांनी मद्य प्राशन केले होते. गोरख हा त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला. त्यानंतर अकराच्या सुमारास ते घराबाहेर झोपले, मध्यरात्री दोनच्या सुमारास गोरख त्यांच्या घरी आला. त्याने रवींद्र झोपेत असताना डोक्यात फावड्याच्या दांडक्याने वार केले. घाव वर्मी लागल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गोरख याने घटनास्थळावरून पळ काढला होता.