30.9 C
Latur
Saturday, May 10, 2025

दगाबाज पाक

आधी शरणागती, ४ तासांत युद्धविरामाचे उल्लंघन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मागील चार दिवसांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. हल्ले-प्रतिहल्ले सुरूच होते. अशा स्थितीत पाकिस्तानने अमेरिकेसमोर गुडघे टेकत मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधून युद्ध थांबविण्याची विनंती केली. त्यावर डीजीएमओच्या पातळीवर संवाद साधल्यानंतर दोन्ही देशांत सामंजस्य करार झाला आणि भारताने महत्त्वाच्या अटी-शर्थींसह युद्धविराम स्वीकारला. परंतु अवघ्या ४ तासांत युद्धबंदीचे उल्लंघन करीत पाकिस्तानने आपले नापाक इरादे स्पष्ट करून दगाबाजीचा चेहरा जगाला दाखविला. भारतानेही आधीच सावध भूमिका घेतली होती. त्यामुळे शस्त्रसंधीचे उल्लंघन करताच भारताने थेट प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.

युद्धविरामाच्या सामंजस्य करारानुसार शनिवार, दि. १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता युद्ध थांबविण्याचा निर्णय झाला होता. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी भारतासोबत शस्त्रसंधी झाल्याची माहिती दिली होती. यावर दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी १२ मे रोजी एकत्रित येऊन चर्चा करण्याचेही ठरले होते आणि पाकिस्तानच्या विनंतीवरून सैनिकी कारवाई थांबवल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले होते.

यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली होती. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्कराच्या महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सुरू असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आजपासून सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराचे ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील, असे म्हटले होते. परंतु अवघ्या चार तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता.  त्यांनी याबद्दल एक्सवर एक पोस्ट करून अमेरिकेने शुक्रवारी रात्रभर मध्यस्थीसाठी बोलणी केली. त्यात भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झाले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे ट्रम्प म्हणाले होते. परंतु पाकिस्तानने ४ तासांत शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. पाकिस्तानने सीमा भागात ड्रोन हल्ले सुरू केले. त्यामुळे अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR