लातूर : प्रतिनिधी
दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे ‘आनंदी शनिवार’ उपक्रमांतर्गत संगीत विभागात एक संस्मरणीय सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित आणि संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात संगीत विभागातील प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीत नुकतेच पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे मनमोहक सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील लपलेली कला उजळून निघाली. कार्यक्रमाची सुरुवात कु. आरती चव्हाण हिच्या भावस्पर्शी कीर्तनाने झाली. तिच्या सादरीकरणाने उपस्थितांना अध्यात्मिकतेचा स्पर्श दिला. त्यानंतर प्रज्वल कांबळे याने ‘‘हर हर गंगे’’ हे भक्तिगीत सादर करत वातावरण भक्तिमय केले. पौर्णिमा मस्के हिने स्वत:च्या लेखनातील ‘‘यश’’ आणि ‘‘आयुष्याचा बाजार’’ या कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. आकाश मुंढे या युवा वादकाने हलगी, ढोलकी आणि सांभळ वाजवत एक मनमोहक वादन सादर केले.
पखवाज वादक आदिनाथ बन याने तुकडे, मुखडे व लग्ग्यांचे सादरीकरण करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. योगेश चाफेकानडे याने उत्कृष्ट तबला वादन करून त्यातील तुकडे, कायदे व मुखडे सादर करत रसिकांची दाद मिळवली. या सर्व कलाकारांना हार्मोनियमवर आविष्कार केसरे याने सुंदर साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय जाधव, योगेश टिकम, ऋत्विक मस्के,गणेश सरवदे, आनंदी भडादे, पल्लवी शेळके, श्रद्धा कुंभार, वैशाखी कांबळे व मानवी शिरशीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ शास्त्रीय संगीताचे सादरीकरण केले नाही तर भक्तिभाव, लयबद्धता आणि प्राचीन भारतीय सांस्कृतिक मूल्यांचाही प्रभावी अनुभव प्रेक्षकांना दिला. ‘आनंदी शनिवार’ उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मंच मिळवून देणारा आणि सांगीतिक परंपरेचा गौरव करणारा ठरला.