लातूर : प्रतिनिधी
येथील दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे दि. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन केम्ट्रिरी फॉर सोसायटी,हेल्थ,इंडस्ट्रीज अॅन्ड फार्मसी (आयसीसीएचएचआयपी-२०२५)’ या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य डॉ. सुरेश भट्टड होते. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सहाय्यक सचिव अजिक्य सोनवणे, स्वारातीम विद्यापीठ, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. आर. मुंडे, माजी प्राचार्य डॉ. जे. एस. तुळबा, महाविद्यालयाचेप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांती सातपुते, रसायनशास्त्र विभाग डॉ. युवराज सारणीकर, आंतरराष्ट्रीय परिषद आयोजक डॉ. रवींद्र शिंदे व समन्वयक डॉ. नाथराव केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना दयानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त सदस्य डॉ. सुरेश भट्टड यांनी शिक्षण हा राष्ट्र उभारणीचा खरा पाया असून समाज व देशहितासाठी संशोधन केले पाहिजे आणि संशोधनाच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांनी करिअर घडविले पाहिजे, असे प्रतिपादन केले. तर डॉ. डी. आर. मुंडे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीच्या हिताचे असून विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेतील ज्ञानाचा फायदा भावी संशोधन व उज्ज्वल भविष्यासाठी करावा, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषद आयोजक डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले. तर आभार डॉ. युवराज सारणीकर यांनी मानले.
तर सूत्रसंचालन प्रा. मेघा पंडित व डॉ. श्वेता लोखंडे यांनी केले. यावेळी जाफना विद्यापीठ, श्रीलंका येथील प्रा. जी. शशिकेश व ठाणे येथील डॉ. एम. आर. कुलकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेतील तीन दिवसीय अनुभव व्यक्त केले. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेतील पोस्टर व ओरल प्रेझेंटेशनमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या संशोधक व प्राध्यापकांना प्रमाणपत्र, बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, इंग्लंड व भारत अशा देश-विदेशाच्या विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, मार्गदर्शक, तंत्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योगपती यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.