आता आमच्या अटींवर कारवाया, मोदींचा पुनरुच्चार
आदमपूर : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूर हे भारताचे न्यू नॉर्मल आहे. भारताने आता तीन सूत्र समोर ठेवली आहेत. यापुढे भारतावर हल्ला झाला तर भारत आपल्या शर्तींवर, आपल्या पद्धतीने आणि आपल्या वेळेनुसार उत्तर देणार आहे. आता कोणीही अणुबॉम्बच्या धमक्यांना भीक घालणार नाही आणि दहशतवादाचे म्होरके आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे सरकार याला वेगवेगळे पाहणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आता दहशतवादी कारवायांना थेट आणि चोख प्रत्युत्तर देईल आणि आम्ही आमच्या अटींवर कारवाया करू, असे म्हटले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर हवाई तळाला भेट देऊन तेथील जवानांचे मनोबल वाढवले. ऑपरेशन सिंदूरचा एक-एक क्षण भारतीय सेनेच्या सामर्थ्याची सक्ष देत आहे. या काळात भारतीय सेनेची सुसूत्रता फारच चांगली होती. नौदलाने समुद्रावर आपली ताकद दाखवून दिली. भूदलाने सीमेवर लक्ष ठेवले तर भारतीय वायूसेनेने हल्लाही केला आणि संरक्षणही केले, अशा शब्दांत त्यांनी भारतीय जवानांचे कौतुक केले. जेव्हा आपल्या बहिणींचे सिंदूर हिसकावून घेतले गेले, त्यावेळी भारत माता की जय, या घोषणेची ताकद जगाने पाहिली. त्यावेळी दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारले, असेही मोदी म्हणाले.
भारताने फक्त सैन्य कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानने अतिरेकी कारवाई केली किंवा सैन्याने हालचाल केली तर आम्ही जशात तसे उत्तर देऊ. हे उत्तर आमच्या अटीवर देऊ. जवानांनी धैर्य असेच कायम ठेवावे. आपल्याला कायम सावध आणि तयार राहिले पाहिजे, अशा सूचना मोदी यांनी भारतीय जवानांना दिल्या.
भारतीय जवानांचा अभिमान
भारतीय सेनेच्या सामर्थ्याची ही ओळख झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मनुष्यबळासोबतच मिशिनींची सुसूत्रता फारच चांगली राहिलेली आहे. पाकिस्तानने लाखो प्रयत्न केले. पण आपले हवाई तळ असो किंवा अन्य सैन्य ठिकाणे यांना काहीही झाले नाही. याचे श्रेय सर्व जवानांना जात आहे. मला सर्व जवानांचा अभिमान आहे, असेही मोदी म्हणाले.