नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त केला. ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे ट्रम्प यांनी मोदींना सांगितल्याचे समजते.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. या भ्याड आणि घृणास्पद दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि समर्थकांना शिक्षा होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
हा कॉल भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण अमेरिकेची सहानुभूती आणि पाठिंबा यामुळे भारताला दहशतवादाविरुद्ध मजबूत राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. भारत-अमेरिका संबंधांमधील वाढती धोरणात्मक भागीदारी लक्षात घेता, ही चर्चा दोन्ही देशांसाठी अधिक महत्त्वाची ठरली आहे. भारताविरुद्धच्या या दहशतवादी हल्ल्याचा ट्रम्प यांनी केलेला निषेध भारताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाविरुद्ध जोरदार आवाज उठवण्याची संधी देईल.
इस्रायल, पुतिनची साथ : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून हा अतिशय अमानवी गुन्हा असल्याचे त्यांनी नमूद केले. दहशतवादाविरुद्ध भारताशी सहकार्य मजबूत करण्याचे आश्वासन दिले. इस्रायलनेही या हल्ल्याचा निषेध केला, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली. तसेच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दर्शवला आहे.
हल्ल्यानंतर सेना अलर्ट : पहलगाममधील या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने सुरक्षा दलांना घटनास्थळी अधिक सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आणि भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर संयुक्त कारवाई सुरू केली. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडता यावे आणि परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ही कारवाई सुरक्षा दलांची सर्वोच्च प्राथमिकता बनली आहे.
मोदी दिल्लीत दाखल : या हल्ल्याचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दोन दिवसांचा सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले आहेत. आज पहाटे ते भारतात दाखल झाले. तत्पूर्वी, मोदींनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थिती सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.