21.9 C
Latur
Friday, February 20, 2026
Homeसंपादकीयदहावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा

दहावीच्या परीक्षार्थींना शुभेच्छा

विद्यार्थीजीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होत आहे. सर्व परीक्षार्थींना निर्भेळ यशासाठी ‘एकमत’च्या शुभेच्छा! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित इयत्ता दहावीची (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) मुख्य परीक्षा आजपासून (२० फेब्रुवारी) सुरू होत असून ती १८ मार्चपर्यंत चालणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार असून मंडळाने या परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश असून राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मंडळाने ५,१११ मुख्य परीक्षा केंद्रांचे नियोजन केले आहे. मुख्य म्हणजे, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये या उद्देशाने मंडळाने ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्याची मुभा दिली होती. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाने वेळापत्रकात महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये पुरेसा खंड ठेवला आहे. परीक्षेसाठी मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्रा धरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षार्थींना सकाळी १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन गतवर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे जादा वेळ वाढवून देण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि ‘कॉपीमुक्त’ अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. राज्यात एकूण २७१ भरारी पथके तैनात करण्यात आली असून जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या लक्ष ठेवणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे तेथे परीक्षा कॅमेराबद्ध केली जाईल. याशिवाय परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी एसटी महामंडळाला नियमित बस सोडण्याच्या आणि वीज वितरण कंपनीला अखंडित वीजपुरवठा करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते किंवा जे मानसिक दडपणाखाली आहेत, त्यांच्यासाठी राज्य मंडळाने १० तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली असून जिल्हा स्तरावरही समुपदेशक उपलब्ध करून दिले आहेत. अपरिहार्य कारणामुळे अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान विशेष परीक्षेची सोय करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी ३ हजार ८७९ ने वाढली आहे.

बारावीच्या परीक्षा सुरू होऊन नऊ दिवस झाले असताना राज्यात सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने आता दहावीच्या परीक्षा सुरू होताना गैरप्रकार रोखण्याचे आव्हान राज्य मंडळासमोर आहे. ‘कॉपीमुक्त परीक्षा’ हे साध्य करण्यासाठी दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी सांगितले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी गतवर्षी ५ हजार १३० परीक्षा केंद्रे होती. परंतु गैरप्रकार घडून आल्याने त्यातील ३१ परीक्षा केंद्र रद्द करण्यात आली. गतवर्षी ९३ कॉपी प्रकरणे आणि २२६ परीक्षेनंतरच्या काळात आढळून आलेले गैरप्रकार असे एकूण ३१९ गैरप्रकार आढळले आहेत. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार असून त्यातील ५५४ केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत. १९१ केंद्रे संवेदनशील असून त्यातील ४२ केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याने त्या केंद्रांकडे पथकांमार्फत अधिक गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्याकरिता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबरला बैठक झाली.

यात दिलेल्या आदेशानुसार परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी निगडीत कर्मचा-यांकडून गैरप्रकार झाल्यास, संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना आणि परीक्षा देताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन, शांत मन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उत्तम यश मिळवता येते. परीक्षेच्या दिवशी वाहतूक कोंडीचा विचार करून घरातून लवकर निघणे गरजेचे आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असते. उशीर झाल्यास अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो. प्रवेशपत्र (हॉल तिकिट) आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय आवश्यक साहित्य पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, मोजपट्टी, कंपास, लेखन पॅड आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी. परीक्षागृहात कोणतेही पुस्तक, वही, मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते.

प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत मन शांत ठेवा. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचा. एखादा प्रश्न अवघड वाटला तरी घाबरू नका आणि प्रश्न सोपा वाटला तरी घाई करू नका. वेळेचे योग्य नियोजन करून सर्व प्रश्न आत्मविश्वासाने सोडवा. उत्तरपत्रिकेवरील सर्व माहिती-आसन क्रमांक, विषय कोड अचूक आणि स्पष्ट लिहा. अक्षर सुवाच्य ठेवा. उत्तर पत्रिकेवर अनावश्यक लिहिणे किंवा खाडाखोड टाळा. बारकोड चिकटवण्यापूर्वी तो आपलाच असल्याची खात्री करा. परीक्षेपूर्वी पुरेशी झोप आणि हलका आहार घ्या. शेवटच्या क्षणी घाईघाईने अभ्यास करण्यापेक्षा आधी केलेल्या तयारीवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार ठेवा आणि तणावापासून दूर रहा. योग्य नियोजन, नियमांचे पालन आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने तुम्ही नक्कीच चांगले यश मिळवू शकाल. तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा भरघोस यशासाठी शुभेच्छा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR