सोलापूर : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुक्रवार पासून सुरू होणार असून त्यासाठी जिल्ह्यात १८४ केंद्रे आहेत. जिल्ह्यातील ७६ केंद्रांवरील (२०१८ पासून गैरप्रकार आढळलेली केंद्रे) पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे.
पहिला पेपर मराठी विषयाचा असून परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार ५७९ विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रत्येक केंद्रावर बोर्डाकडून बैठे पथक नेमण्यात आले आहे. याशिवाय परीक्षेतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची सात भरारी पथके देखील नेमली आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात कोणताही ताण न घेता शांत वातावरणात अभ्यास करून पुरेशी झोप व संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. रात्री खूप उशिरापर्यंत जागरण न करता पहाटे साडेपाच ते आठ या वेळेत केलेला अभ्यास फायद्याचा ठरतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
सराव परीक्षांमध्ये जो अभ्यास पूर्ण झालेला नाही हे ओळखून विद्यार्थ्यांनी त्यावर भर द्यावा आणि सर्व उत्तरांची सोडवणूक होईल, यादृष्टीने वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन मुख्याध्यापक संघाने केले आहे. दरम्यान, बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यास सध्याची आणि जुलैमध्ये होणारी परीक्षा देता येत नाही. त्यामुळे आपल्याकडून परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता प्रत्येकांनी घ्यावी, असे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पेपरची वेळ सकाळी ११ वाजता असेल तर विद्यार्थ्याने अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहाणे आवश्यक आहे. अंगझडती घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडले जाते. विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षार्थींच्या हाती पडण्यापूर्वी सर्वांची उपस्थिती बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर एखादा विद्यार्थी आल्यास त्याला वर्गात प्रवेश द्यायचा की नाही याचा अधिकार तेथील केंद्र संचालकांना आहे.