25.7 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeलातूरदहावी, बारावीच्या ‘कॉपीमुक्त’ परीक्षेसाठी प्रशासन सज्ज!

दहावी, बारावीच्या ‘कॉपीमुक्त’ परीक्षेसाठी प्रशासन सज्ज!

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील १०० परीक्षा केंद्रांवर ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून १५२ परीक्षा केंद्रांवर सुरु होणार आहे. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वदंना फुटाणे, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव नागेश मापारी यांची यावेळी उपस्थिती होती.
इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रभावीपणे उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. सर्व परीक्षा केंद्र संचालकांनी निर्भयपणे व योग्य पर्यवेक्षकांची नियुक्ती करुन परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होतील, याची दक्षता घ्यावी. कोणतीही अडचण असेल, तर तातडीने प्रशासनास कळवावे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा कालावधीत सुरु राहतील, याची खातरजमा करावी. तसेच परीक्षा कालावधीत जे केंद्र संचालक उत्कृष्ट परीक्षा संचालन करतील, अशा तीन केंद्र चालकांचा केला जाईल. एखाद्या केंद्रावर कॉपी आढळून आल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रारंभी माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. सूत्रसंचलन उपशिक्षणाधिकारी संजय क्षिरसागर यांनी केले, प्रमोद पवार यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR