नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सीबीएसईने २०२६ पासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच सीबीएसईचे अधिकारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. दोनदा परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाची यावेळी चर्चा करण्यात आली. एखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा काही कारणाने त्याची परीक्षा चुकली तर तो पुन्हा परीक्षेला बसू शकतो. त्याचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल, त्यावर लोकांकडून सूचना मागवल्या जातील.
सीबीएसई २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून २६० परदेशी शाळांसाठी जागतिक अभ्यासक्रम देखील सुरू करणार आहे. या नवीन मूल्यमापन मॉडेलमध्ये सहजतेने बदल करण्यासाठी सीबीएसई शिक्षकांच्या प्रशिक्षणातही गुंतवणूक करत आहे.
तणावमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ही आवश्यक पावले आहेत. परीक्षांमध्ये सुधारणा आणि बदल हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सुधारणांमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी होण्यास मदत होईल, असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.