मुंबई : प्रतिनिधी
आजचे राजकारण हे किळसवाणे आणि घृणास्पद झाले आहे. या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरश: शून्य झाली आहे… छक्के-पंजे करता येणे हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरेच राजकारणात रहावे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात घडलेल्या एका घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ नागरिकांनी लावलेले श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीकडून हटवण्यात आल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटत असताना कर्जतमधील ही घटना विशेष चर्चेत आली आहे.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले श्रद्धांजलीचे बॅनर हटवण्यामागचे कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला होता. २९ जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये, गावांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स लावले होते. कर्जत शहरातही अशाच प्रकारे भावनिक वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.
मात्र नगरपंचायतीकडून हे फ्लेक्स हटवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत ही कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, ही घटना केवळ अजित पवारांचा अवमान करणारी नाही, तर नागरिकांच्या भावनांनाही धक्का देणारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांत केली.
रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. श्रद्धांजलीचे फ्लेक्स काढण्यामागे प्रशासनाचे नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनीही यावर नाराजी व्यक्त केली असून, श्रद्धांजलीसारख्या भावनिक बाबतीत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्जतमधील या निर्णयावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
फ्लेक्स हटवण्याच्या घटनेने वाद
या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सांगलीतील या कार्यक्रमानेही अजित पवारांविषयी असलेली जनभावना स्पष्ट झाली. राज्यभरात विविध ठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम पार पडत असताना कर्जतमधील फ्लेक्स हटवण्याच्या घटनेने मात्र वेगळाच वाद निर्माण केला आहे.

