25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रदानवेंचा तोल सुटला, सभागृहात शिवीगाळ

दानवेंचा तोल सुटला, सभागृहात शिवीगाळ

दानवे-लाड यांच्यात जुंपली, विधान परिषदेत गदारोळ
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषद हे राज्याचे सर्वोच्च सभागृह मानले जाते. पण या सभागृहात आज चांगलाच गदारोळ झाला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी रंगली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला. त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लाड यांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, यावरून चांगलाच गदारोळ झाला.

विधान परिषदेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या मुद्यावर हा गदारोळ झाला. यावेळी अंबादास दानवे आपली भूमिका मांडत असताना सत्ताधारी आमदारांनी आरडाओरड केली. यानंतर अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर भर सभागृहात शिवीगाळ केली. यावेळी भर सभागृहात दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. दानवे यांनी थेट आसन सोडून पुढे धाव घेतली. त्यावेळी चांगलाच गदारोळ झाला.

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून दानवे यांनी सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे की, हे वक्तव्य ज्याचे असेल त्याचे, ते लोकसभेत झालेले आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी आ. लाड यांनी थेट दानवे यांच्याकडे बोट करून जोरदार निशाणा साधला. तेव्हा सत्ताधा-यांची आरडाओरड सुरू झाली. यावेळी दानवे यांचा संयम सुटला. ऐ माझ्याकडे हात करायचा नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी दोन्ही बाजूंनी शिवीगाळ झाल्याची माहिती समोर येत आहे.

आ. लाड आक्रमक
सभागृहात राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव करून लोकसभेत पाठवला जावा, अशी मागणी केली किंवा विरोधी पक्षनेत्याने यावर उत्तर द्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे उभे राहिले आणि त्यांनी सभागृहात सर्वांसमोर माझ्यावर शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी लाड यांनी केली. दरम्यान, उद्या उपसभापती निलम गो-हे यांच्या दालनात यासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत कारवाईचा निर्णय होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR