22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रदानवेंनी खैरेंची गळाभेट घेत भरवला पेढा

दानवेंनी खैरेंची गळाभेट घेत भरवला पेढा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज खैरे यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. उमेदवारीबद्दल पुष्पगुच्छ देत आणि पेढा भरवत अभिनंदनही केले. या वेळी एकमेकांनी गळाभेट घेत नाराजीनाट्यावर पडदा टाकला.

दरम्यान, लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतही अशीच नाराजी आणि त्यानंतर गळाभेट, तोंड गोड करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लागलेला निकालही संभाजीनगरकरांनी पाहिला. त्यामुळे यावेळच्या गळाभेटीतून गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टळेल, अशी अपेक्षा सामान्य शिवसैनिक बाळगून आहेत.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अंबादास दानवे इच्छुक होते, तशी मागणीही त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. परंतु गेल्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभवाची कारणे, पार्श्वभूमी पाहता ठाकरेंनी पुन्हा एकदा खैरेंना संधी देण्याचा निर्णय घेतला. यामागे जिल्ह्यातील शिवसैनिकांची मर्जीही होती. साहजिकच या निर्णयाने अंबादास दानवे दुखावले, त्यांनी माध्यमांशी बोलताना नाराजीही व्यक्त केली, आपण खैरेंचा प्रचार करणार नाही, शिवसेनेचा प्रचार करणार, असे सांगत मनातील सल बोलून दाखवली.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला एक-एक जागा महत्त्वाची आहे. ती जिंकायची असेल तर आधी पक्षांतर्गत कुरबुरी मिटवणे गरजेचे होते. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत खैरे-दानवे यांना जे काही सांगायचे होते, ते सांगितले आणि आज हे ‘राम-भरत भेटी’चे चित्र समोर आले. या भेटीमागे आणखी एक कारण दडलेले होते, ते म्हणजे अंबादास दानवे यांच्याविरोधात तयार झालेले संशयाचे जाळे. खैरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होणार, हे स्पष्ट झाल्यापासूनच दानवे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते.

अखेर यावर पडदा टाकण्याचे ठरले आणि आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास दानवे यांनी खैरेंच्या डेक्कन येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा, पुष्पगुच्छ देत पेढा भरवला. खैरेंनीही आता जुनं सगळं सोडून द्या, इथून पुढे आम्ही एकत्र काम करणार? अशी ग्वाही दानवेंना पेढा भरवत दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR