नागपूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील कोतवालबड्डी परिसरातील दारुगोळा निर्मिती करणा-या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी असल्याचे समजते. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला? हे अद्याप कळू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचे छप्पर कामगारांवर पडले आणि लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्ती केली जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
स्फोटाच्या वेळी कंपनीत अनेक कामगार काम करत असल्याचे समजते. त्यामुळे स्फोट होताच अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. काही कामगारांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. मात्र स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.