28 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeमहाराष्ट्रदाल में कुछ काला है...

दाल में कुछ काला है…

शरद पवार गटाची चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका

पुणे : प्रतिनिधी
आपल्या महिला आयोगाचा कारभार हा असा आहे ‘वराती मागनं घोडं’. बरं, बाईंचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत. कालपरवा छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असताना बाई सर्वांत आधी स्वागतासाठी उभ्या होत्या.

समोर मीडिया होती, पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले. त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की ‘दाल में कुछ काला है’! ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेली प्रतिक्रिया आहे का? हा प्रश्न आमच्या मनात आहे, अशी खरमरीत टीका शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याच्या घरात सून वैष्णवी शशांक हगवणे हिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने आपले आयुष्य संपवले. जमीन खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणायला लावण्यासाठी तिला खूप मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू , नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरा व दीर फरार आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी खरमरीत टीका केली आहे.

वैष्णवीची केस ही पुण्याची आहे, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. हगवणे हा अजित दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजित दादांनी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीही या हगवणेची हकालपट्टी केल्याबाबतची नोटीस काढायला हवी होती. पण अजूनही त्याची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणा-या चित्रा वाघही या प्रकरणात गप्प आहेत. याचा अर्थ असा की, सत्तेतील सर्वच लोक ‘आपला’ म्हणून हगवणेला वाचवत आहेत. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे. अशी खरमरीत टीका खडसे यांनी केली.

दरम्यान, वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती, सासू व नणंद यांची पोलिस कोठडी २६ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे अद्याप मोकाट आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR