नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नागरिकांसाठी दिवाळीचा आनंद आता जीवघेणा ठरला आहे. दिवाळी सुरु होताच दिल्ली-एनसीआरच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, प्रदूषण ‘अतिशय खराब’ श्रेणीत पोहोचले आहे. वाढत्या धोक्यामुळे, वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या उप-समितीने तातडीची बैठक घेऊन ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन दुसरा टप्पा त्वरित लागू करण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीतील आनंद विहार येथे सर्वात जास्त प्रदूषण नोंदवले गेले आहे, जिथे वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४१७ इतका ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचला आहे. नवीन दिल्लीत ‘एक्यूआय’ ३६७, विजय नगर (गाझियाबाद) येथे ३४८, नोएडा सेक्टर-१ मध्ये ३४४ आणि नोएडा येथे ३४१ नोंदवण्यात आला आहे.
प्रदूषणाची पातळी धोकादायक ठरल्यामुळे एक १२-सूत्रीय कृती योजना त्वरित लागू केली आहे. यामध्ये स्टेज-१ च्या उपायांव्यतिरिक्त अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश आहे. आयोगाने एनसीआरमधील सर्व राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीला या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, आज दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘खराब’ नोंदवली गेली आहे. मात्र अनेक भागांमध्ये ती ‘अतिशय खराब’ ते ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचली आहे.