मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेवरून अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. दिल्लीच्या सूचनेनुसार डोंबा-याचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू हलतो आहे, असे म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
राज्यात सत्ता स्थापन करण्यास अद्यापही राज्यपालांनी महायुतीला पाचारण केले नाही. त्यामुळे भाजपाकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भांडणे लावण्यात येत आहेत. आता डुप्लिकेट शिवसेनेला हा अवमान रोज सहन करावा लागणार आहे. त्यांना आता भाजपा पक्ष कसा आहे हे कळेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच, सरकार स्थापनेचा गोंधळ सुरू असून हे एक प्रकारे अराजक आहे. तीन पक्षांना पूर्ण बहुमत मिळालेले असतानाही सत्तास्थापनेला उशीर का होतो? असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा महायुतीने केलेला नाही. दहा दिवसांनंतर पूर्ण बहुमत असलेली आघाडी किंवा पक्ष राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही.
…तर राष्ट्रपती राजवट लागली असती
आपल्यामागे किती आमदार आहेत? याचीदेखील यादी देत नाहीत. विशेष म्हणजे राज्यपालांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलेले नसून भाजप प्रदेशाध्यक्ष तारीख जाहीर करतात. आझाद मैदानावर शपथविधीची तयारीदेखील सुरू होते, मंडप घातला जातो, कार्पेट टाकले जाते. नेमका हा काय प्रकार आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच, आम्ही असतो आणि एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असती, असा टोलादेखील त्यांनी लगावला.