मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहसोबत बैठक
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली गाठली. सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा झाली. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबईत परतले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आगामी विधानसभेच्या जागावाटपाबाबत खल झाल्याचे समजते.
आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारीच दिल्लीत पोहोचले होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीसाठी रवाना झाले. अमित शाह यांच्यासमवेत तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याचे समजते.
शिंदे गटासह अजित पवार गट आगामी विधानसभेसाठी ८० हून अधिक जागा लढवण्यास इच्छूक आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा पराभव झाला. आता विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याचा अजित पवार गटाचा मानस आहे तर शिंदे गटानेदेखील आपली लोकसभा निवडणुकीतील खदखद बोलावून दाखवली. त्यामुळे शिंदे गट देखील ८० हून अधिक जागा लढवण्यास इच्छूक आहे. सद्यस्थितीत भाजपचे १०४ आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत जास्तीत जास्त जागा देणे हा भाजपचा प्रयत्न असणार आहे. परंतु आता अजित पवार गट आणि शिंदे मिळून १६० हून अधिक जागांची मागणी करत आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीतील चर्चा महत्त्वाची आहे.
ऑक्टोबरमध्ये निवडणुका?
सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महायुतीसह महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत चांगलीच कंबर कसताना दिसत आहेत. मात्र, यात जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे जागावाटपात कशी तडजोड होते, यावर गणित अवलंबून आहे.