९ शेतकरी जखमी, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीकडे निघालेल्या शेतक-यांच्या मोर्चात आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सुमारे अर्धा तास पोलिसांशी वाद झाल्यानंतर शेतक-यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. या झटापटीत ९ शेतकरी जखमी झाले आहेत. हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवरून १०१ शेतकरी दुपारी १२ वाजता दिल्लीला रवाना झाले. घग्गर नदीवर बांधलेल्या पुलावर पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिस रॉकेट लाँचरमधून बॉम्ब आणि गोळ््या झाडत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. घग्गर नदीचे दुर्गंधीयुक्त पाणी वापरले जात आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील १२ गावांमधील इंटरनेट बंदी १८ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. खनौरी सीमेवर सलग १९ व्या दिवशी युनायटेड किसान मोर्चा (गैर-राजकीय) नेते जगजीत डल्लेवाल आमरण उपोषणाला बसले आहेत. शेतकरी नेते सर्वन पंढेर म्हणाले की, डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल संपूर्ण देश चिंतेत आहे, पण देशाच्या पंतप्रधानांना नाही.
केमिकल पाण्याचा फवारा
पोलिसांनी शेतक-यांवर रासायनिक पाण्याचा फवारा केल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. पाण्याचा मारा करायचा होता, तर निदान शुद्ध पाणी तरी मारा, अशी टीकाही त्यांनी केली. पोलिसांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि देशातील शेतक-यांवर घाण पाण्याचा मारा सुरु केल्याचे ते म्हणाले. हरियाणा पोलिसांनी शेतक-यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या असून यात एक शेतकरी जखमी झाला.