सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, धक्काबुक्कीवरून आरोप-प्रत्यारोप, हे सर्व क्लेशदायक : खरगे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात राजधानी दिल्लीत आज संसदेसमोर कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. त्याचवेळी भाजपच्या सदस्यांनीही विरोधकांच्या भूमिकेचा निषेध करीत निदर्शने केली. त्यामुळे संसदेसमोर धक्काबुक्की झाल्याचा आरोप-प्रत्यारोप करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत जी वक्तव्ये करत आहेत, ती क्लेशदायक आहेत. हे सगळे जाणीवपूर्वक केले जात आहे, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरूंबाबत जे काही सांगितले आहे, ते खोटे आहे. आज संसदेत जे काही घडले, ते योग्य नाही. लोकसभा, राज्यसभा या ठिकाणी अशा गोष्टी घडू नयेत, हाच आमचा प्रयत्न असतो. आम्ही कुठलाही अडथळा आणलेला नाही. १४ दिवस सभागृह कशी चालतील, याकडेच आम्ही लक्ष दिले आणि मग आंदोलन केले, असेही खरगे म्हणाले.
आमच्याकडे हा मुद्दा होता की अदानी देशाला लुटत आहेत आणि त्या मुद्यावरुन आम्ही सरकारला प्रश्न करत होतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संविधानाबाबत चर्चा सुरु झाली, त्यावेळी अमित शाह यांनी जे वक्तव्य केले, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खिल्ली उडवली गेली. तुम्ही किती वेळा आंबेडकर-आंबेडकर असे म्हणता, त्याऐवजी तुम्ही देवाचे नाव घेतले तर तुम्ही सात जन्म स्वर्गात असता. एखाद्या पक्षाची जर ही मानसिकता असेल, एखाद्या नेत्याची अशी भूमिका असेल तर ती निषेधार्ह आहे. अशा गोष्टी तुम्ही देशापुढे ठेवणार असाल तर काय बोलणार, एवढेच नाही तर त्यांच्यापैकी कुणीही चूक मान्य करायला तयार नाही. अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी, ही मागणी आहे. त्यामुळे आम्ही हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी समोर आणला.
धक्काबुक्की केलीच नाही
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ््यापासून आंदोलन सुरू केले. त्यानंतर शांततापूर्ण मार्गाने आम्ही रांगेत चाललो होतो. त्यावेळी भाजपाच्या खासदारांना काय झाले, ते मला माहीत नाही. प्रतापचंद्र सारंगी यांनी राहुल गांधी यांनी धक्का दिल्याने आपण जखमी झाल्याचा आरोप केला. उलट तेच मसल पॉवर दाखवू लागले. मलाही धक्का दिला. आमच्याबरोबर ज्या महिला खासदार होत्या, त्यांनाही रोखण्यात आले. आमच्यावर हल्ला करण्यात आला. मला धक्का दिला, त्यावेळी माझा तोल सुटला आणि मी पटकन खाली बसलो. आता ते आमच्यावर आरोप करत आहेत की आम्ही धक्काबुक्की केली. परंतु आम्ही कोणालाही धक्काबुक्की केलेली नाही, असे खरगे म्हणाले.
देशव्यापी आंदोलन उभारणार
संसदेत जे काही वातावरण तयार करण्यात आले, ते भाजपा खासदारांचे कृत्य गैर आहे. आम्ही हे कधीही सहन करणार नाही. याविरोधात आम्ही आता आंदोलन उभे करणार आहोत. शांततापूर्ण पद्धतीने संसदेचे कामकाज सुरु होते, ती शांतताभंग करण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे, असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केला.