नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात आयपीएलच्या १८ व्या मोसमातील पाचवा विजय मिळवला. या मोसमातील ३२ व्या सामन्यात दिल्ली विरुद्ध राजस्थान आमनेसामने होते. हा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने राजस्थानवर मात करत हा विजय साकारला.
राजस्थानने दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी १२ धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे आव्हान २ चेंडू राखून पूर्ण केले. दिल्लीने ४ बॉलमध्ये १३ धावा केल्या. के. एल. राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने या १३ धावा करुन दिल्लीला विजय मिळवून दिला. त्याआधी दिल्लीने राजस्थानला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर २ धावांची गरज होती. तेव्हा अक्षर पटेलने स्ट्राईक एंडवर केलेल्या थ्रोवर विकेटकीपर के.एल. राहुल याने ध्रुव जुरेलला रन आऊट केले. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
दरम्यान, राजस्थान शेवटच्या ओव्हरमध्ये ९ धावा करण्यात अपयशी ठरला. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल ही जोडी मैदानात होती. दिल्लीकडून मिचेल स्टार्क बॉलिंगसाठी आला. स्टार्कने चिवट बॉलिंग केली. स्टार्कने पहिल्या ४ बॉलमध्ये ५ धावा दिल्या तर पाचव्या बॉलवर राजस्थानच्या जोडीला २ धावा घेण्याची संधी होती. मात्र ध्रुव जुरेलने चूक केली. त्यामुळे राजस्थानला एकच धाव मिळाली. त्यानंतर राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर २ रन्स पाहिजे होत्या. मात्र ध्रुव दुसरी धाव घेताना रन आऊट झाला. त्यामुळे राजस्थानही १८८ धावाच करु शकली आणि सामना टाय झाला.