21.9 C
Latur
Tuesday, January 28, 2025
Homeराष्ट्रीयदिल्ली निवडणुकीसाठी ‘आप’चा जाहीरनामा; १५ आश्वासनांची घोषणा

दिल्ली निवडणुकीसाठी ‘आप’चा जाहीरनामा; १५ आश्वासनांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील सत्ताधारी आपसह काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. तसेच, नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. अशातच आज आपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात समाविष्ट असलेल्या १५ आश्वासनांची घोषणा केली. यावेळी, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह आपचे खासदार संजय सिंह, दिल्ली कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज आणि गोपाल राय देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील १५ आश्वासने 
१) रोजगार हमी: आम्हाला दिल्लीत एकही व्यक्ती बेरोजगार राहू नये, सर्वांना रोजगार मिळावा अशी इच्छा आहे. दिल्लीतील प्रत्येक मुलाला रोजगार कसा मिळेल, याची आम्ही योजना आखत आहोत.
२) महिला सन्मान योजना :
महिला सन्मान योजना लागू केली जाईल. या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा २१०० रुपये दिले जातील. सरकार स्थापन होताच हा पहिला निर्णय घेतला जाणार आहे.

३) संजीवनी योजना :
या योजनेअंतर्गत आप सरकार ६० वर्षांवरील वृद्धांच्या उपचारांची व्यवस्था करणार आहे. उपचारांचा सर्व खर्च दिल्ली सरकारद्वारे केला जाईल.
४) पाणी बिल :
अरविंद केजरीवाल म्हणाले की, जेव्हा मी तुरुंगात गेलो होते, तेव्हा मला कळले की अनेक लोकांना हजारो रुपयांचे पाण्याचे बिल पाठवले गेले आहे. ज्यांना चुकीचे बिल मिळाले आहे, त्यांनी बिल भरू नये. सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही बिले माफ करू.

५) २४ तास पाणी :
प्रत्येक घरात २४ तास पाणी आणि स्वच्छ पाण्याची सुविधा केली जाईल. दरम्यान, गेल्या निवडणुकीतही हे आश्वासन देण्यात आले होते, मात्र, गेल्या पाच वर्षांत हे काम करू शकलो, असे यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले. आधी कोरोना आला आणि नंतर माझी तुरुंगवारी झाली. त्यामुळे माझी संपूर्ण टीम बिखरली. त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. मात्र, आता ते पूर्ण करू.

६. स्वच्छ यमुना :
यमुना नदी स्वच्छ करण्यात येईल. दरम्यान, हे सुद्धा आश्वासन आपने गेल्या निवडणुकीत दिले होते.

७. रस्ते :
आम्ही दिल्लीचे रस्ते युरोपियन दर्जाचे बनवू असे म्हटले होते. गेल्या निवडणुकीतही हे आश्वास दिले होते, पण गेल्या पाच वर्षांत ते काम करू शकले नाही. पण यावेळी सर्व रस्ते चांगले केले जातील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना:
दलित समाजातील कोणत्याही मुलाने कोणत्याही परदेशी विद्यापीठात प्रवेश घेतला, तर त्याचा सर्व खर्च दिल्ली सरकार करणार आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

९) विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास
विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास दिला जाईल. दिल्ली मेट्रोमध्ये भाड्यात ५० टक्के सूट दिली जाईल.

१०) पुजारी आणि ग्रंथी योजना :
पुजारी आणि ग्रंथी योजना लागू करण्यात येईल. अरविंदे केजरीवाल म्हणाले, गुरुद्वारा आणि मंदिरांमध्ये आमच्यासाठी पूजा करतात. त्यापैकी बरेच जण गरीब आहेत. त्यांना या योजनेद्वारे दरमहा पैसे दिले जातील.

११) भाडेकरूंना सुद्धा मिळेल लाभ :
भाडेकरूंना वीज बिल आणि पाणी बिलाचाही लाभ मिळेल.

१२) गटार दुरुस्ती : आपचे सरकार स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत अनेक गटारांची दुरुस्ती केली जाईल. दिल्लीतील जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या दीड वर्षात बदलल्या जातील.

१३) रेशनकार्ड : गरिबांना लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्ड जारी केली जातील.

१४) मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपयांची मदत :
ऑटो, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांच्या मुलींच्या लग्नासाठी दिल्ली सरकार १ लाख रुपयांची मदत देणार आहे. तर मुलांना मोफत प्रशिक्षण देईल. तसेच, १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

१५) कायदा आणि सुव्यवस्था :
दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. सर्व आरडब्ल्यूएसाठी खाजगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचेही आश्वासन आपच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR