६९९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून, ईव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅट मशिनसह कर्मचारी मंगळवारी सायंकाळीच सर्व केंद्रांवर पोहोचले. दिल्लीतील दीड कोटी मतदार केजरीवाल सरकारचे भवितव्य ठरविणार आहेत. ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार मैदानात असून, उद्या मतदानानंतर या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीत आप, भाजप आणि कॉंग्रेस या तीन प्रमुख पक्षांत थेट लढत झाली.
दिल्लीत मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ७ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निमित्ताने निवडणूक आयोगाने मतदारांना उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत १ कोटी ५६ लाख १४ हजार मतदार ईव्हीएम मशिनचे बटन दाबून मतदान करणार आहेत. या निवडणुकीत भाजप, आप आणि कॉंग्रेससह इतर पक्षांचे मिळून एकूण ६९९ उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. उद्या सायंकाळी ६ वाजता या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांच्याच नजरा असतील. कारण यावेळी दिल्लीत आपची यावेळी सत्त्वपरीक्षा आहे. कारण भाजपने आपची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कॉंग्रेसनेही आपला लक्ष्य केले आहे. त्यामुळे यावेळी आप बॅकफूटवर गेली आहे. परंतु मतदारांचा कौलच या निवडणुकीचे भवितव्य ठरविणार आहे.
दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) आर. एलिस वाज यांनी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन केले आहे. आरामदायी मतदान व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना मतदान करताना गैरसोय होणार नाही. मतदान केंद्रांवर चिकित्सा किट, पॅरामेडिकल स्टाफ तैनात केला आहे.