सोलापूर :सोलापूर लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील नागरिकांचे मतदान घेण्यासाठी मतदान केंद्रावर देण्यासाठी आणलेल्या २३२ अपंगांच्या व्हीलचेअर दोन महिन्यांपासून डफरीन हॉस्पटलमध्ये धुळखात पडून आहेत. इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी गाडी मिळत नसल्याने त्या धूळखात पडल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत ३६ लाख २७ हजार ७५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावाला. सोलापूर शहरामध्ये २३२ इमारतींमध्ये ७७२ मतदान केंद्रांवर २३२ व्हीलचेअर दिव्यांग मतदानरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मतदान प्रक्रियेच्या वेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांगांना मतदान करताना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर त्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ८१ व्हीलचेअर नव्याने खरेदी करण्यात आल्या आहेत.
मतदान प्रक्रिया झाल्यानंतर या सर्व व्हीलचेअर डफरीन हॉस्पिटलमध्ये एकत्रित करुन ठेवण्यात आल्या होत्या. मतदान होऊन दोन महिने झाले तरी संकलित करण्यात आलेल्या या व्हीलचेअर अद्याप धूळखात पडून आहेत. घेऊन जाण्यासाठी गाडी मिळत नसल्याने या चेअर पडून आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली आहे. रेबिज आणि इतर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र या ठेवण्यात आलेल्या व्हीलचेअरमुळे अडचण निर्माण झाली आहे.