लातूर : प्रतिनिधी
येथील उद्योग भवन परिसरातील टयुशन एरियामधील दिशा फिजिक्स क्लासेसचे संचालक प्रा. शशिधर यांनी जवळपास ३०० विद्यार्थ्यांचे शिकवणीचे प्रत्येकी २५ हजार रुपये घेऊन गायब झाल्याने मागील चार महिन्यापांसून शिकवणी वर्ग बंद आहेत. पालकांचा पैसा तर गेलाच परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालकांसह विद्यार्थीनी चिंतेत आहेत.
उद्योग भवन परिसरातील ट्युशन एरियामध्ये प्रा. शशिधर यांचे दिशा फिजिक्स क्लासेस नावाने शिकवणी वर्ग असून,जवळपास ३०० पालकांनी आपल्या पाल्यासाठी फिजिक्स विषयाची शिकवणी दिशा फिजिक्सचे संचालक प्रा. शशिधर यांचेकडे लावली आहे. प्रा. शशिधर याने शिकवणी फी म्हणून मे २०२४ मध्ये जवळपास या ३०० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करुन घेतले व ८ दिवस शिकवणी वर्ग घेतले. त्यानंतर शिकवणी वर्ग बंद केले ते आजतागायत बंदच आहेत.
पालक व विद्यार्थ्याान्भ अनेकवेळा प्रा. शशिधर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही दिवस त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र गेल्या काहीं दिवसांपासून त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसुन, फिजिक्स शिकवणी वर्ग बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. शिकवणी वर्गासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन पसार होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. प्रा. शशिधर यांनीही ३०० विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन पालकांची फसवणुक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे.
पालक, विद्यार्थ्यांची पोलिसांकडे तक्रार
फसवणूक झालेल्या पालक व विद्यार्थ्यांनी दि. २८ रोजी लातूरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिशा फिजिक्सचे संचालक प्रा. शशिधर यांनी पैसे बळकावण्याच्या उद्देशाने, हेतुपरस्पर, फसवणुक करण्याच्या हेतुने विद्यार्थ्यांकडून शिकवणी फिस म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात फिस घेऊन प्रा. शशिधर शिकवणी वर्ग बंद करुन गायब झाले आहेत. त्यामुळे आमची फसवणुक झाली आहे, अशी तक्रार पालक व विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे केली आहे.