सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
दिशा सालियनच्या वडिलांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मारिया यांच्यासह मुंबई पोलिसांवरही या याचिकेद्वारे आरोप करण्यात आला.
यापूर्वी जेव्हा दिशा सालियानच्या वडिलांशी संवाद साधण्यात आला होता, तेव्हा अशी कुठलीही शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती. मात्र, आता त्यांनी याचिका दाखल करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोठे ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मारिया यांच्यासह मुंबई पोलिसांवरही या याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा आणि हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशा पद्धतीची मागणी या प्रकरणात करण्यात आली आहे.
नव्याने चौकशीची मागणी
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्याने चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.
पेडणेकरांवरही आरोप
मुंबई पोलिस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी केला. नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला.