मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गुरुवारी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधा-यांच्या विरोधात विधान भवनाच्या पाय-यावर आंदोलन केले. तर दुसरीकडे दिशा सालियनला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांनी मूक आंदोलन केले. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्षे न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हिचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या.
शिवसेना आमदारांनी विधान भवन परिसरात फलक झळकावले. या हत्येत दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, दिशाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलनादरम्यान केली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधान भवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले आहे.
दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का, दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी, असे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या.
आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी : राणे
दुसरीकडे भाजपाचे नेते आणि मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनीही दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की, ही हत्या आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे.