लातूर : प्रतिनिधी
दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना लातूर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. दि. ३० जून रोजी दुपारी लातूर शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वारा न सुटता अगदी शांतपणे पाऊस पडत होता हे रविवारच्या पावसाचे वैशिष्ट्ये राहिले आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत पाऊसच पडला नव्हता. त्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडतो की काय?, अशी चिंता होती. परंतू, रविवारच्या पावसाने शेतक-यांना दिलास दिला.
यंदाचा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच सुरु झाला. जुन महिन्याच्या साधारणत: २० दिवसांत जिल्ह्यात २०९.२ मिली मीटर पावसाची नोंद झाली. पेरणी योग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ५ लाख ९९ हजार ४५५.५२ हेक्टर क्षेत्रापैकी ४ लाख ९१ हजार ८३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली. सुमारे दहा दिवसांत जिल्ह्यात मोठा पाऊसच पडला नाही. दरम्यान जिल्ह्यात कधी तरी कुठे तरी हलकासा पाऊस पडायचा. पावसाळा असूनही दखल घ्यावी असा पाऊसच नव्हता. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू, गेल्या दोन दिवसांत हवामानात बदल झाला. शनिवारी आकाशात ढगांची गर्दी झाली. काही क्षणात मोठा पाऊस पडेल, असे वाटत असताना हलकासा सडाका आला आणि पाऊस थांबला. रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. दुपारी ढगांची गर्दी झाली आणि पावसाला सुरुवात झाली. अगदी शांतपणे अर्धा ते पाऊण तास मोठा पाऊस पडला. त्यानंतर थांबुन थांबुन पाऊस पडत होता.
भारतीय हवामान खात्याने मोसमी पाऊसाबाबत वर्तविलेला अंदाज खरा ठरला होता. मोसमी पाऊस वेळेच्या अधीच लातूर जिल्ह्यात बसरला. आनंदसरी बरसल्याने उन्हाळयाची प्रचंड काहिली सहन केलेल्या लातूर जिल्ह्यातील नागरीकांना सुखद दिलासा मिळाला. जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत दररोज पावसाची हजेरी होती. त्यानंतर कधी कधी पाऊस पडत गेला आणि २० जूनपासून पावसाने दडीच मारली होती. त्यामुळे वातावरणातदेखील प्रचंड उकाडा होता आणि तापमानातसुद्धा वाढ होत होती. शेतक-यांसह सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा होती. अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर रविवारी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतक-यांना दिलासा मिळाला. परंतू, जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होण्याकरीता मोठे आणि सलग पाऊस आवश्यक आहे.