हिमायतनगर: प्रतिनिधी
तालुक्यातील सोनारी गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. दि.२३ रोजी रात्री घडलेल्या या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अन्य दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोकर येथून हिमायतनगरकडे दुचाकीवर मंगेश ढोले व राजू ढोले हे जात होते. त्याचवेळी अन्य एक दुचाकीस्वार वैभव राजू गोरे हे भोकरकडे जात होते. हिमायतनगर ते भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी गावाजवळ या दोन्ही दुचाकींची (क्र. एम एच २६ सी डी ९२८४ व एम एच २६ सि बी ५७७९) समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही दुचाकींची गती जास्त असल्याने व रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे दुचाकींवर नियंत्रण राखता आले नाही. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू दि.२४ रोजी दुपारी वैभव राजू गोरे (रा.शेलगाव ता.अर्धापुर) यांचा मृत्यु झाला तर मंगेश ढोले, बालाजी ढोले (रा. एकघरी ता. हिमायतनगर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बिट जमादार सिंगनवाड यांनी दिली.
दरम्यान अपघात घडताच सोनारी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक शरद जराड, सहायक पोलिस निरीक्षक पाटील व बीट जमादार सिंगनवाड यांच्यासह चार ते पाच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी झालेल्या तिघांना रुग्णवाहिकेद्वारे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.